Monday, 2 July 2012

विठ्ठल मुळचा कुठला? - एका निष्कारण चालू असलेल्या वादाचे उत्तर

Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र टाईम्स मधील या बातमीने हा निबंध लिहिण्यास प्रवृत्त केले. प्रस्तुत लेख श्री. संजय सोनवणी या लेखकांनी लिहिला असून सोनवणी "विठ्ठलाचा नवा शोध" या ग्रंथाचे लेखक आहेत. वरील लेखात मांडलेल्या थियरी चा सारांश खालील प्रमाणे आहे.

थोडक्यात विट्ठलाला वैष्णव मानणे व विट्ठलाला विष्णु-कृष्णरूप मानणे हे अनैतिहासिक आहे. तो पशुपालक समाजाचा पौंड्रवंशीय श्रेष्ठ पुरुष होता आणि महान शिवभक्त होता, हेच काय ते सत्य आहे. परंतु विट्ठलाचे वैदिकीकरण-वैष्णवीकरण करण्याच्या नादात ज्या भाकडकथा निर्माण केल्या गेल्या, त्यामुळे मूळ सत्यावर जळमट पडले होते. 

लाल फोन्ट मध्ये असलेल्या मूळ बातमी च्या लिंक वर क्लिक करून पूर्ण लेख वाचक वाचू शकतात.  विठ्ठल विष्णू नाही, त्यास विष्णू बनवणे हे हिंदूंचे कारस्थान होते हे या थियरीचे म्हणणे आहे. यास प्रत्यक्ष पुरावा लेखात काहीही देण्यात आलेला नाही. तरी या थियरीचे यथाशक्ती यथामती सप्रमाण "rebuttal" खाली करीत आहे. 


लेखक म्हणतात त्याच्या विपरीत पुंड्र हा देश बंगाल मध्ये येतो, महाराष्ट्रात नाही. महाजनपदकालीन बंगाल चे तीन देश होते - अंग, वंग आणि पुंड्र. उत्तर बंगाल (सिलिगुडी आणि गंगा-ब्रह्मपुत्रा मधील दोआब या भागाला पुंड्र असे म्हणत. पौंड्रक वासुदेव इथला होता. त्यामुळे पौंड्र आणि पुंडरीक वगैरे ओढाताण इथेच मिटली. अधिक हे बंगाल मधले पौंड्र कालांतराने दक्षिणेत गेले यास पुरावा काय? काहीही नाही 1.

विष्णू सहस्त्रनामात व्यंकटेश देखील नाव नाही. बालाजी हे नाव देखील नाही. मग आता बालाजी देखील विष्णू नाही, हे म्हणणार का. म्हणजे शैव मताची वाट लाऊन झाल्यावर आता हे वैष्णव मताची देखील वाट लावणार.  विष्णूसहस्त्रनाम महाभारताचा भाग आहे. मरताना भीष्माने केलेल्या श्रीकृष्ण स्तुतीला विष्णूसहस्त्रनाम असे म्हणतात. जेव्हा भीष्म स्तुती करत होता तेव्हा कृष्ण त्यासमोर उपस्थित होता. मग भीष्मांना विठ्ठलाची माहिती कशी असेल? अधिक विष्णुपुराण आणि स्कंदपुरण येथे पांडुरंगमहात्म्य आहे. 7

तिसरा आक्षेप म्हणजे पंढरपुरात खूप शिवमंदिरे आहेत. आणि पुंडलिकाच्या समाधीवर देखील शिवलिंग आहे म्हणून ते शिवालय आहे. वास्तविक प्रत्येक समाधीवर अगर समाधी नजीक शिवलिंग असते. रावेरखेडी येथे बाजीराव पेशव्याच्या समाधीवर देखील पिंड आहे. मग त्या समाधीस देखील शिवालय म्हणणार का?

लेखक म्हणतात तसे महाभारतात पांडूराष्ट्र कधीच नव्हते, अश्मक महाजनपद होते. हे पांड्य देशाचे वर्णन आहे.. तामिळी पांड्य वंश आणि हे काल्पनिक पांडूराष्ट्र एक नव्हे. अधिक औंड्र नावाचे जनपद अस्तित्वात असल्याचा संदर्भ कुठेही आढळला नाही. महाराष्ट्रास त्याकाळात अश्मक (पाली मध्ये अस्सक) महाजनपद म्हणायचे. दगडांचा देश हे नाव. नांदुरा राजधानी होती आणि कोल्हापूर दुसरी. कोल्हापूरच्या अश्मक वंशीय श्रुगाल आणि श्रीकृष्ण याचे युद्ध झाल्याचे वर्णन महाभारतात आहे ज्यात श्रीकृष्णाने श्रुगालाचा सुदर्शनचक्राने शिरच्छेद केला. अश्माकांची एक राजधानी पौडण्यपूर (हे प्राकृत नाव आहे, मूळ संस्कृत नाव बहुधान्यपूर) हे आहे. हे गाव म्हणजे आजचे महाराष्ट्र-आंध्र सीमेवरचे "बोधन".  बौद्धग्रंथ - महागोविंद सुत्तांत यात अश्मक (अस्सक) देशाचा राजा ब्रह्मदत्त पोटली (बोधन चे आणखीन एक नाव) येथून राज्य करतो असे म्हणते. 4

पांडूरंग म्हणजे पंडूरोग्याचा रंग नव्हे. पांडुरंग काळा आहे कारण तो खडक काळा आहे. मार्बल मध्ये कोरलेला श्रीकृष्ण गोराच असतो. पांडुरंगाचे वर्णन श्रीकृष्णाचे आहे कारण श्रीकृष्णाच्या मृत्यूच्या दोन कथा आहेत. एक मुख्यधारेतली कथा कि तो गुजरातेत शिकाऱ्याचा बाण पायास लागून मेला, आणि दुसरी महाराष्ट्रात प्रचलित असलेली गोष्ट म्हणजे तो महाराष्ट्रास येऊन विठ्ठल झाला (पर्यायाने इथे स्थायिक होऊन इथेच मेला, कारण द्वारका बुडाली होती). विठ्ठलास कुणी कर्पूरगौर म्हंटल्याचे कधी ऐकिवात नाही. पंढरपूर या क्षेत्राच्या पंडरगा या जुन्या नावावरून पांडुरंग हे नाव विठोबाला मिळाले आहे असे म्हणतात 8. पांडुरंग म्हणजे पांढऱ्या त्वचेचा देव असा अर्थ लावणे अनर्थ आहे. पांडुरंगपूर आणि विठ्ठल यांचा संबंध शोभना गोखले यांनी त्यांच्या शोधनिबंधात दाखवून दिला आहे. 3 अधिक, रामकृष्ण भांडारकर म्हणतात कि विठू हा कानडी शब्द विष्णू चा अपभ्रंश आहे कारण कानडी आणि काही दक्षिण महाराष्ट्रीय लोक "ष्ण" चा अपभ्रंश ठ असा करतात असे भांडारकर म्हणतात. त्यास ते बरेच पुरावे देखील देतात 5

कर्नाटकातून विठ्ठल महाराष्ट्रात आणल्या गेला हि तर प्रसिद्ध कथा आहे 10, 11. विजयनगर चे राजे विठ्ठलाला खूप मानीत. सातव्या शतकात आदि शंकराचार्यांनी पाडुरंग शतकस्तोत्र रचले आहे. त्यात देखील विठोबास विष्णू म्हणूनच स्तविले आहे 9

जे सोनवणी यांनी लिहिले आहे त्याचा एक मुख्य संदर्भ Richard Maxwell Eaton या इंग्रज लेखकाच्या The social history of deccan या पुस्तकातून आहे. हीच गोष्ट Chritian Lee Novetzke या अमेरिकन लेखकाच्या पुस्तकात देखील आहे 6. Novetzke म्हणतो कि महानुभाव पंथाने विठोबाला शैव पंढरपुरात स्थापन केले. पण मग कुठलाही तत्कालीन देशी सोर्स असले का बोलत नाही. हे असे शोध नेहमी इंग्रजांनाच कसे लागतात हे कळत नाही. विठोबाच्या मंदिराच्या आसपास अनेक शिवालये आहेत त्यांच्या तारखा कुणी काढल्या का? आणि आदि शंकरांनी स्मार्त संप्रदाय स्थापन केल्यानंतर शंकर-विष्णू-सूर्य-गणपती-देवी या पाच देवतांची एकत्रित पंचायतन पूजा भारतात सुरु झाली. वेगवेगळ्या लोकांनी विविध संप्रदायात विखुरलेला भारतीय समाज एकत्र बांधायचा प्रयत्न सुरु केला हे माहिती असताना हे प्रश्न कसे पडतात. प्रश्न पडणे चांगली गोष्ट आहे, पण उत्तराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे योग्य नाही. 

कमरेवर अथवा कमरेजवळ हात ठेऊन असलेला विष्णू सर्वत्र आढळतो जसे उदयगिरी, मध्य प्रदेश येथील हि मूर्ती 
 


मध्ये केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिर देखील तिथे खजिना सापडल्यावर ते हिंदूंचे नाही ते ब्राह्मणांनी बौद्धांकडून ढापले आहे असल्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. पांडुरंग उर्फ विठ्ठल हा श्रीकृष्ण आहे हीच सर्वांची मान्यता आहे आणि होती. जर प्रतिसृष्टी निर्माण करायची धमक, कुवत आणि इच्छा नसेल तर हि असलेली सृष्टी तोडायचा प्रयत्न देखील करू नये. पंढरपूर आणि विठ्ठलाच्या मागे असंख्य संतांची आणि भक्तांची पुण्याई आहे. असल्या लेखांनी ती काडीमात्रदेखील कमी होणार नाही. भक्ती असेल तर विठोबामध्ये देखील शिवभक्तला शंकर दिसेल. रामदास स्वामींना नाहीका विठोबामध्ये श्रींराम दिसला. म्हणून कुणी तरी एक "रामसंप्रदाय" सुरु करू नये आणि श्रीराम असलेल्या विठोबाला कृष्णरूपात भजणे "अनैतिहासिक" आहे हा शोध लाऊ नये हि प्रार्थना. राष्ट्रावर मोठे संकट येत असताना हे जातीपाती आणि पंथांमधले वाद निर्माण करायची उबळ कशी काय येते, देव जाणे.

संदर्भसूची

3 comments:

 1. अंबरीष, तुमचे लेख छान माहितीपूर्ण असतात. तुमच्या ब्लॉगर साईट वर तुम्ही 'Follow by Email' चा ऑप्शन देऊ शकता का?
  http://buzz.blogger.com/2011/03/engage-your-audience-with-follow-by.html

  ReplyDelete
 2. Marathitil pahila tamasha Mohana batav ya kathechi mahiti milel ka ??

  ReplyDelete
 3. "पौंड्र" चे अजून दोन उल्लेख - १) पौन्ड्र वासूदेव - श्रीकृष्णाने यालाही मारले. २) भीमाच्या शंखाचे नाव पौंड्र होते.

  ReplyDelete